रेशनिंग कार्ड कसे मिळवायचे व उपयुक्तता याबद्दलची उपयुक्त माहिती.
रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका म्हणजे रास्त दर दुकानातून जीवनाश्यक वस्तू व शिधा मिळविण्यासाठी सार्वजनिक वितरण योजनेमार्फत पुरवण्यात येणारी व्यवस्था. रेशनकार्ड मिळविणे, त्याचे नूतनीकरण करणे किंवा फाटलेले, जीर्ण, गहाळ झालेले रेशनकार्ड बदलून घेणे, नवीन नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे हे सर्व आपल्यासाठी नेहमीच आव्हानात्मक वाटत असते. रेशनिंग कार्ड कसे मिळवायचे व उपयुक्तता याबद्दलची उपयुक्त माहिती.
कसे मिळवाल नवीन रेशनकार्ड
ज्या व्यक्तीचे नाव कोणत्याही रेशनकार्डात
समाविष्ट नाही, अशा व्यक्तींच्या वास्तव्याच्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात, अन्न
धान्य वितरण कार्यालय अथवा
शिधावाटप नियत्रकांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा.
हे अर्ज त्या कार्यालयात उपलब्ध असतात. त्या अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, वय,
कुटुंबातील व्यक्तींचे नावे, वय, नाते इत्यादी माहिती भरून दिल्यानंतर माहिती
बरोबर आहे किंवा नाही याबाबत पुरवठा निरीक्षक/शिधावाटप निरीक्षक यांनी खात्री केली
जाते. पडताळणी तपशील योग्य असल्याची खात्री होताच अशा व्यक्तीस रेशनकार्ड दिले
जाते.
आवश्यक कागदपत्रे
पूर्वीच्या रेशनकार्डमधून नाव कमी केले असेल, त्या
तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. तर त्याचबरोबर
स्वत:चे घर असल्यास घराच्या मालकीचा पुरावा, लाइट बिल, बँकेचे पासबुक,
टेलिफोन/मोबाइल बिल आवश्यक आहे. तसेच फोटो ओळखपत्रासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग
लायसन्स, अलॉटमेंट लेटर किंवा आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला
जातो. भाड्याने राहणाऱ्यांसाठी घरमालकाचे संमतीपत्र व मालकाच्या नावे लाइट बिल आणि
घर भाडे करारपत्राची झेरॉक्स.
नाव कमी, वाढविण्यासाठी
रेशनकार्डवर नाव वाढविण्याची आणि कमी करण्याची
प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जन्म, विवाह होऊन स्थंलातरीत होणे, स्वतंत्र होणे,
स्वतंत्र वास्तव्य, नोकरीनिमित्त स्थलांतरीत होणे, मृत्यू होणे इत्यादी कारणांमुळे
रेशनकार्डातील नावे कमी करणे किंवा वाढविणे यासाठी विहित नमुन्यात अर्ज करता
येतो. अर्जाच्या माहितीची तपासणी करून माहितीची खात्री पटल्यास रेशनकार्डातील नाव
कमी किंवा वाढविले जाते.
नावाबाबतचे पुरावे
कमी
करण्यासाठी : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू
झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे. तर नोकरीनिमित्त
स्थंलातरीत झाल्यास बदलीच्या आदेशाची झेरॉक्स प्रत व नव्या ठिकाणच्या वास्तव्याचा
पुरावा गरजेचा आहे. तर नाव कमी करायचे संबंधित व्यक्तीचे संमत्री पत्र आवश्यक आहे.
नाव
वाढविण्यासाठी : जन्मणाऱ्या मुलापासून
ते १६ वर्षांच्या आतील मुलांचे नाव वाढविण्यासाठी त्याचा जन्म दाखला किंवा शाळेतील
बोनाफाइड दाखला असणे आवश्यक आहे. तर १६ वर्षांवरील मुलांची नावे वाढविण्यासाठी
प्रतिज्ञापत्र असणे गरजेचे आहे.
बेघर व असंघटित व स्थलांतरित कुटुंबांसाठी...
मुळात राइट टू फूड अंतर्गत बेघर, असंघटित व
स्थलांतरीत कुटुंबांसाठीही रेशनकार्डाची उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार
रेशनकार्ड कार्यालयात विहित नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज
करून रेशनकार्ड मिळविता येते. त्यानुसार राज्य सरकारने परित्यक्ता स्त्रियांसाठी
रेशनकार्ड काढता येते. त्याचप्रमाणे बेघर कुटुंबीयांना, शहरी भागातील असंघटित व
अस्थिर जीवन जगणाऱ्या कुटुंबांना, वारांगना, वारांगनांच्या मुलांच्या
पुनर्वसनासाठी आणि विधवा व निराधर स्त्रियांना रेशनकार्ड काढता येऊ शकते.
कोणाला
कोणते कार्ड मिळते
- पांढरे - १ लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब
- केशरी - १५ हजार ते १ लाख रु. दरम्यान उत्पन्न असलेले कुटुंब
- पिवळे बीपीएल - १५ हजार रुपयांपेक्षा कमी वाषिक उप्तन्न असलेले कुटुंब
- अंत्योदय - पिवळ्या कार्डधारकांपैकी अतिगरीब असलेली कुटुंबे
- अन्नपूर्णा - कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ न मिळणारी ६५ वर्षांहून अधिक वय असेलेली निराधार व्यक्ती
लागणारा कालावधी
नवीन कार्ड काढायचे असो किंवा नाव कमी किंवा वाढविण्याची प्रक्रिया असो, या प्रत्येकासाठी एक विशेष असा कालावधी आखून दिलेला आहे. त्यानुसार ती कामे न झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.
- नवीन शिधापत्रिकेसाठी १महिना
- इतर राज्यातून आलेल्या अर्जदारांना नवीन तात्पुरत्या कार्डासाठी १५ दिवस
- नाव वाढविणे ७ दिवस
- नवीन जन्मलेल्या लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी १ दिवस
- हरविलेल्या कार्डाऐवजी दुय्यम कार्ड देणे १० दिवस
- नाव कमी करण्यासाठी १ दिवस
- पत्त्यातील बदल ७ दिवस
- कशासाठी कोणता अर्ज
- नवीन नोंदणीसाठी नमुना अर्ज एक
- नाव कमी करण्यासाठी नमुना अर्ज आठ
- नाव वाढविण्यासाठी नमुना अर्ज नऊ
- कुटुंबप्रमुख व्यक्ती बदल किंवा वय बदलासाठी नमुना १८
रेशनकार्ड हरविल्यास
रेशनकार्ड हरवल्यास, चोरी झाल्यास किंवा गहाळ
झाल्यास रेशनकार्ड कार्यालयातील त्या स्वरूपाचा नमुना अर्ज उपलब्ध आहे. तो अर्ज
सादर करताना दुकानदाराची सही व शिक्का किंवा स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
केल्याची पावती दिल्यास नवीन दुय्यम रेशन कार्ड दिले जाते.
तक्रार आणि हेल्पलाइनसाठी
मुळात रेशकार्ड काढण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या
तक्रारी असल्यास शिधावाटप परिमंडळ कार्यालयात त्या करता येतात किंवा विभागानुसार
मुंबई शहरात सध्या ४५ विभाग कार्यालये असून त्यानुसार त्याठिकाणी जाऊन तक्रार करू
शकता किंवा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या
http://fcs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भेट देऊ शकता किंवा १८००२२४९५० किंवा
१९६७ या टोलफ्री नंबर संपर्क साधू शकता.
0 टिप्पण्या